नोएडा : अभिनेत्री ऐश्वर्या रायचा बनावट पासपोर्ट जप्त करण्यात आला असून या प्रकरणी ३ जण पोलिसांच्या ताब्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या नायजेरियन टोळीच्या मुसक्या आवळल्या असून तीन सदस्यांना अटक केली आहे.धक्कादायक असे की,बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे नाव आणि तपशील असलेला बनावट पासपोर्ट जप्त केला आहे. पोलिस उपायुक्त (झोन III) अभिषेक वर्मा यांनी माहिती दिली की पोलिस स्टेशन बीटा -2 आणि ग्रेनो सायबर सेलने ग्रेटर नोएडा येथून तीन नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. एक उफेरेमुक्वे, एडविन कॉलिन्स आणि ओकोलोई डॅमियन अशी त्यांची नावे आहेत.
अॅबॉट फार्मास्युटिकल्स’ कंपनीसह इतर कंपन्यांचे प्रतिनिधी म्हणून ही टोळी लोकांना लक्ष्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, असे डीसीपीने सांगितले. या टोळीकडून पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या नावाचा बनावट पासपोर्टही जप्त केला आहे. आरोपींच्या चौकशीतून त्यांना ऐश्वर्या रायचा बनावट पासपोर्ट कोणत्या उद्देशाने वापरायचा होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या टोळीने निवृत्त कर्नलला स्तनाचा कर्करोग बरा करण्यासाठी दुर्मिळ औषधी वनस्पती देण्याच्या बहाण्याने सुमारे 1 कोटी 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे सांगण्यात येत आहे. टोळीचे सदस्य कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवत आणि फसवणूक करणाऱ्या ग्राहकांना महागड्या किमतीत औषधी वनस्पती विकत घेत. याशिवाय ही टोळी मॅट्रिमोनिअल वेबसाइट्स आणि डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून लोकांना सतत टार्गेट करत होती, असे पोलिसांनी सांगितले.अटक केलेल्यांकडे व्हिसा आणि पासपोर्टही नव्हते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.