सध्यस्थितीत तूर पिक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून मागील ३ -४ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. तसेच अंधारीरात्र असल्यामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर अंडे देऊ शकतात. या सर्व बाबी तुरीवरील घाटेअळी / शेंगा पोखणारी अळीस पोषक असल्यामुळे सध्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येऊ शकतो.
काही ठिकाणी अळीने तुरीवरील कळ्या, फुले व शेंगा फस्त करण्यास सुरुवात केली आहे. या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास ७० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते.
शेंगा पोखरणाऱ्या अळ्या सुरुवातीच्या काळात पिकाच्या कोवळ्या पानांवर, फुलावर किंवा शेंगावर उपजीविका करतात, नंतर शेंगा भरतांना त्या दाणे खातात. दाणे खात असताना त्या शरीराचा पुढील भाग शेंगामध्ये खुपसून व बाकीचा भाग बाहेर ठेऊन आतील कोवळ्या दाण्यावर उपजीविका करतात.