पुणे,(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. या पार्श्वभूमीवर संपुर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत असताना आज पुण्यातील एका कार्यक्रम त्या वक्तव्याचा निषेध करीत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चेह-यावर ‘शाईफेक‘ केल्याची घटना घडली.
दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे केलेल्या वादग्रस्त विधानामुळे उद्घाटन कार्यक्रमस्थळी तणाव होता. ‘पाटील यांना शहरात पाउल ठेवू देणार नाही’, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी प्रचंड पोलिस बंदोबस्त देखील तैनात होता.
मंत्री चंद्रकांत पाटील सायंकाळी ५ वाजेच्या च्या सुमारास मंदिर परिसरात आले. उद्घाटन कार्यक्रमाला जाण्यापूर्वी भाजपचे कार्यकर्ते मोरेश्वर शेंडगे यांच्या घरी चहापानासाठी थांबले. यानंतर सहाच्या सुमारास घरातून बाहेर पडल्यावर काही क्षणात अज्ञाताने त्यांच्या अंगावर शाई फेकली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. पोलिसांची धावपळ उडाली.
पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे ते कोणत्या संघटनेचे आहेत, कोण आहेत हे अद्याप कळले नाही. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त आयुक्त संजय शिंदे घटनास्थळी दाखल झाले आहेत.