थंडीच्या दिवसांत बाजारात आंबट गोड बोरं तुम्हाला दिसतच असेल. लहान दिसणारे हे फळ आवर्जून खायला हवं. आरोग्यासाठी बोरं खाणे खूपच फायदेशीर असल्याचे म्हटलं जाते.प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सौंदर्याच्याही समस्यांवर उपाय म्हणून बोरांचा रानमेवा अवश्य खायला हवा. पाहूयात बोरं खाण्याचे ५ फायदे…
१. सी व्हिटॅमिन हे केवळ आंबट फळांमध्ये असते असा आपला समज असतो. मात्र बोरांमध्ये सी व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी बोरांचा आहारात आवर्जून समावेश करावा.
२. वजन कमी करणाऱ्यांसाठी बोरं हे अतिशय उत्तम फळ आहे. कारण यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असूनही ऊर्जा जास्त प्रमाणात असते.
३. बोरांमध्ये अँटीॉक्सिडंटसचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे त्वचा आणि केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. इतकेच नाही तर कॅन्सरसारखा असाध्य आजार होऊ नये म्हणूनही ही अँटीऑक्सिडंटस उपयुक्त ठरतात.
४. थंडीच्या दिवसांत पचनशक्ती सुधारावी म्हणून बोरं खाणं फायदेशीर ठरतं. इतकंच नाही तर बद्धकोष्ठता, गॅसेस यांसारख्या संमस्यांवरही बोरं चांगली असतात.
५. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास बोरं खाण्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळेच मधुमेहींना आवर्जून बोरं खाण्याचा सल्ला दिला जातो.