मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न चांगलाच पेटला असून आज कर्नाटकच्या बेळगाव येथे महाराष्ट्रातील 10 वाहनांवर दगडफेक करत हल्ला करण्यात आला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
“मुख्यमंत्री बोम्मईकडून चिथावणीखोर वक्तव्ये होत असल्याने सीमावाद उफाळून आला आहे. 48 तासात महाराष्ट्रातील मराठी भाषिक जनतेवर हल्ले करणं, त्यांना त्रास देणं थांबवण्यात आलं नाही तर परिस्थिती चिघळू शकते. तर मलाही कर्नाटकमध्ये जावं लागले, असा इशारा पवार यांनी दिला.
देशाला ज्यांनी संविधान दिलं. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनादिवशी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर घडलं ते निषेधार्ह आहे.महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील स्थिती गंभीर झाली आहे. माझा स्वतःचा अनेक वर्षांपासून संबंध आहे. हे चित्र घडत असताना दोन्ही मुख्यमंत्र्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता होती.
देवेंद्र फडणवीसांनी बोम्मई यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पण त्याचा काही परिणाम झाला नाही. हे वेळीच थांबलं नाही परिस्थिती चिघळू शकते. येत्या २४ तासात वाहनांवरचे हल्ले थांबले नाहीत तर संयमाला रस्ता पहायला मिळेल, या स्थितीची जबाबदारी कर्नाटक सरकारवर असेल, असा इशारा पवार यांनी दिला.