नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. अनेकांना माहिती आहे आजचा दिवस म्हणजे भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी भारतीय नौदलाने इतिहास घडवला होता. 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध जिंकलेल्या भारतीय नौदलाचे सामर्थ्य आणि शौर्य लक्षात ठेवण्यासाठी दरवर्षी 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा केला जातो. 4 डिसेंबर 1971 रोजी ‘ऑपरेशन ट्रायडंट’ अंतर्गत भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची नौदल तळावर हल्ला करुन धुळ चारली होती.
भारतीय इतिहास हा वायव्येकडील हल्ल्यांच्या घटनांनी भरलेला आहे.पण भारताची सागरी सीमा खूप विस्तीर्ण आहे आणि आजच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत तिची सुरक्षा आणि भारतीय नौदलाचे महत्त्व या दोन्ही बाबतीत अधिकाधिक संवेदनशील बनले आहे. 4 डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा नौदल दिन हा केवळ एका ऐतिहासिक घटनेचा वर्धापन दिन नाही तर भारतीय नौदलाला योग्य दृष्टीकोनातून पाहण्याचा दिवस आहे.
पाकिस्तानी पाणबुडी हल्ल्यासाठी सज्ज
3 डिसेंबर 1971 च्या रात्री भारतीय नौदलाचे जहाज मुंबईहून निघाले होते, पण त्यांना कल्पना नव्हती की एक पाकिस्तानी पाणबुडी PNS हँगोर त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे थांबली आहे. पाकिस्तानी पाणबुडी हल्ला करण्याच्या तयारीत फिरत होती. यावेळी पाणबुडीमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे समुद्राच्या तळाशी जावे लागले. यावेळी एक पाकिस्तानी पाणबुडी दीवच्या किनाऱ्याभोवती फिरत असल्याचे भारतीय नौदलाच्या लक्षात आले.
अशी केली ऑपरेशन ट्रायडंटची प्लानिंग
त्यावेळी नौदल प्रमुख ॲडमिरल एसएम नंदा यांच्या नेतृत्वाखाली ‘ऑपरेशन ट्रायडंट’ची योजना तयार करण्यात आली. पाणबुडीविरोधी फ्रिगेट्स INS खुकरी आणि किरपान यांना देशातील समुद्र किनारी फिरणाऱ्या पाकिस्तानी पाणबुडीला नष्ट करण्याचे काम सोपवण्यात आले होते. या कामाची जबाबदारी 25 व्या स्क्वाड्रन कमांडर बब्रू भान यादव यांच्याकडे देण्यात आली होती. 4 डिसेंबर 1971 रोजी ‘ऑपरेशन ट्रायडंट’ अंतर्गत भारतीय नौदलाने कराची नौदल तळावरही हल्ला केला. दारूगोळा पुरवठा करणाऱ्या जहाजासह अनेक जहाजे नष्ट झाली. यावेळी पाकिस्तानचे तेल टँकरही उद्ध्वस्त करण्यात आले होते.
कराचीतील तेल डेपो जळून खाक
भारतीय नौदलाने त्यावेळी अनेक पाकिस्तानी जहाजे बुडवली होती. आयएनएस विक्रांतच्या डेकवरून लढाऊ विमानाने पाकिस्तानच्या कराची बंदर आणि चितगाव आणि खुलना येथील हवाई तळांवर हल्ला केला. पाकिस्तानी लष्कराची जहाजे, संरक्षण सुविधा नष्ट करण्यात आली. या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे आणि विक्रांतच्या हवाई हल्ल्यांमुळे पूर्व पाकिस्तानात पाकिस्तानी सैन्याचा कराची बंदरावर पराभव झाला. अनेक दिवस कराची बंदरातील तेलाच्या साठा जळत होता. या लढाईत भारतीय नौदलाची आयएनएस खुकरी देखील बुडाली आणि 18 अधिकाऱ्यांसह सुमारे 174 खलाशांचा मृत्यू झाला होता.