मुंबई: कर्नाटक सरकारकडून सांगली जिल्ह्याच्या जतच्या तिकोंडी भागात पाणी सोडण्यात आल्यामुळे जत तालुक्यातील दुष्काळी गावांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पाणी सोडून कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील गावांना महाराष्ट्रापासून तोडण्याची खेळी केली आहे. दरम्यान यावर राज्याचे पाणीपुवठामंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पाणी सोडणे हा शेजारधर्म आहे. त्यात काय एवढे? कर्नाटक काही देशाबाहेर नाही. त्यांनी पाणी सोडले चांगले झाले. त्यांच्याकडे चांगला पाऊस पडावा अशी प्रार्थना करू, असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. गुलाबराव पाटील यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना पुन्हा एकदा 5 कोटी रुपये देण्यात आले. त्यांनी फुटून बाहेर पडू नये म्हणून त्यांना ही रक्कम देण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणी काही म्हणतंय. 5 कोटी घेतले असं म्हणतात. ही रक्कम मोजायला ते गुवाहाटीला गेले होते का ते सांगावं? सर्व आमदार श्रद्धेने कामाख्या देवीला गेले होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.