जळगाव : जळगाव दूध महासंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत. दूध महासंघाच्या निवडणुकीसाठी येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान होणार असून काल 28 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख होती. महाविकास आघाडी आणि शिंदे-भाजप पॅनलच्या महत्त्वाच्या उमेदवारांची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन्हीकडून जोर लावण्यात आला.यात खेचाखेचीत शिंदे गटाने बाजी मारल्याचे दिसून आले.
कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संजय पवार यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. संजय पवार यांनी आधी बंद दाराआड एकनाथ खडसेंसोबत चर्चा झाली. नंतर अजित पवार यांना फोनवर शब्दही दिला. त्यांतरही ते पळून गेले. एकनाथ खडसे यांनीच हा आरोप केलाय.
संजय पवार यांच्या शिंदे गटाकडे पळून जाण्याची मोठी चर्चा सध्या रंगली आहे. तर दुसरीकडे दिलीप वाघ यांनाही गळाला लावण्यात गिरीश महाजन यांना यश आलंय. उमेदवारी अर्ज माघारीच्या काही मिनिटं आधी ते बिनविरोध निवडून आले.
दरम्यान, मी शिंदे-भाजपकडूनच निवडणूक लढवणार होतो. तडजोडीची अट मविआनेच टाकली होती. मी पळून गेलेलो नाही, शब्द पाळणारा आहे, अशी प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली. दरम्यान या वर्तणुकीनंतर संजय पवार यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.