मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी नुकतंच गुवाहाटी येथे जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीकडे महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी साकडं घातल्याचं सांगितलं होतं. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून निशाणा साधत राजकीय भविष्यवाणीही करण्यात आली आहे.
‘आसाममध्ये महाराष्ट्र भवन व महाराष्ट्रात आसाम भवन निर्माण करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले. एकंदरीत पडद्यामागच्या हालचाली पाहता मुख्यमंत्री लवकरच माजी होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शिल्लक गटासह आसामातच राहावे लागेल. त्याची सोय ते जाता जाता करीत असावेत,’ असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
महाराष्ट्रात विविध शक्तिपीठे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी राज्यातील संकटे दूर करण्याचे साकडे घालण्यासाठी थेट गुवाहाटीला गेल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.
‘महाराष्ट्रातील जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत, आनंद, सुख-समृद्धी मिळावी असा नवस कामाख्या देवीच्या चरणी केल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात, पण महाराष्ट्रावरील खरे संकट मुख्यमंत्री व त्यांचा गद्दार मिंधे गट हेच आहे. तेव्हा हे संकट देवी लवकरात लवकर दूर करेल व महाराष्ट्राला सुखाचे, आनंदाचे, स्वाभिमानाचे दिवस आणेल याविषयी आमच्या मनात शंका नाही. देवी एकदम कडक आहे याची प्रचीती येईलच,’ अशी टीका करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री मान्य करतात की, राज्यावर संकटे आहेत, पण ती दूर करण्यासाठी पंढरपूरची विठोबा माऊली आहे. आई भवानी, तुळजा देवी आहे, मुंबादेवी आहे. महाराष्ट्रात अनेक शक्तिपीठे असताना मुख्यमंत्री आसामातील रहस्यमय व गूढ जागेत जाऊन प्रार्थना करतात हे चित्र आझादीच्या अमृत महोत्सवात कधीच कोणी पाहिले नव्हते,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्याचा ‘सामना’तून समाचार घेण्यात आला आहे.