पारोळा- पालिकेच्या मुख्य पाइपलाइनवरून (मेन रायझिंग) अनेकांनी नळ कनेक्शन घेतले आहेत. त्यावरून ते अमर्याद पाणी वापर करतात. अशा ग्राहकांच्या नळांना मीटर बसवून त्याप्रमाणे पाणीपट्टी वसुली करा, असे आदेश मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांनी पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता गणेश महाजन यांना दिले आहेत. त्यामुळे अभियंता महाजन कधी अंमलबजावणी करतात? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
शहराला बोरी धरणावरून पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदा बोरी धरण १०० टक्के भरले असून दोन महिन्यापासून अतिरिक्त पाण्याचा बोरी नदीत विसर्ग सुरू आहे. परिणामी शहरासह ग्रामीण भागाला यंदा पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. दरम्यान, बोरी धरण हे शंभर टक्के भरून ही पारोळा शहरात आजही सहा ते सात दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे शहरातून नाराजीचा सूर उमटतो. पाणीपुरवठा किमान ३ दिवसांआड करावा, अशी मागणी आहे. दुसरीकडे जलशुद्धीकरण केंद्रावरून तर जलकुंभापर्यंत मुख्य रायझिंग पाइपलाइन टाकली आहे. महामार्गालगत काही रहिवासी व व्यावसायिकांनी त्यावरून नळ कनेक्शन घेतले आहेत. या पाण्याचा व्यावसायिक वारेमाप वापर करतात. दुसरीकडे मुख्य वाहिनीवरून पाणी वापरले गेल्याने एकमेव जलकुंभ भरण्यास व पाणीपुरवठ्यास विलंब होतो. परिणामी या मेन रायझिंगवरील नळ कनेक्शन बंद करावे, अशी मागणी अनेकदा झाली आहे. मात्र, राजकीय वरदहस्तामुळे पालिका कारवाई करत नाही.
बेकायदेशीर कनेक्शन असल्यास थेट गुन्हे नोंदवा
उन्हाळ्यात पालिकेने मेन रायझिंगवर कनेक्शन असलेल्यांवर कारवाईची तयारी केली. मात्र, अंमलबजावणी न झाल्याने ही उपाययोजना कचरा कुंडीत जमा झाली. त्यामुळे व्यावसायिक नळ कनेक्शन असलेल्यांकडून अमर्याद पाणी उपसा सुरूच आहे. ही बाब निदर्शनास येताच मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांनी मंगळवारी पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता गणेश महाजन यांना मेन रायझिंग कनेक्शनवरून कनेक्शन घेतलेल्या सर्वांना नळांना मीटर बसवण्यास सांगितले. तसेच बेकायदेशीर कनेक्शन असल्यास थेट गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.