चोपडा – आमचा गाव आमचा विकास’ उपक्रमांतर्गत तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे २ दिवशीय प्रशिक्षण सोमवारपासून चोपड्यात सुरू झाले. येथील अग्रसेन भवनात चोपडा पंचायत समितीमार्फत सोमवारी सकाळी १० वाजता आयोजित शिबिराला सुरुवात झाली. त्यात गाव विकासासाठी १५ वित्त आयोगातून मिळणाऱ्याचे निधीचे नियोजन करणे हा हेतू आहे.
सन २०२०-२०२५ असा पंचवार्षिक कालावधीचा ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करण्यासाठी तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. गटविकास अधिकारी बी. एस. कोसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली अडावदच्या सरपंच भावना माळी यांचे हस्ते उद््घाटन झाले. ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर सोनवणे उपस्थित होते. मास्टर ट्रेनर सागर धनाड यांनी आरोग्य, शिक्षण, उपजीविका, महिला, मागासवर्गीय व इतर असा विकास आराखडा तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विस्तार एस. बी. कोळी, सूत्रसंचालन विस्तार अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले. जगन्नाथ पाटील यांनी सहकार्य केले.