जामनेर- पाच वर्षासाठी जरी अापण सरपंच राहत असलो, तरी आपण कायमस्वरूपी गावात राहतो. त्यामुळे आपल्या गावाचा शाश्वत विकास व मूलभूत गरजा लक्षात घेऊन सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. यासाठी वेळप्रसंगी अहंकार बाजूला ठेवून सरपंचांनी ग्रामसेवकांना मदत करून कृती आराखडा तयार करावा, असे आवाहन पंच संघटनेचे तालुका सचिव युवराज पाटील यांनी केले.
‘आमचे गाव, आमचा विकास’ या अभियानांतर्गत शहापूर गणात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून ग्रामसेवक संघटनेचे सचिव युवराज पाटील बाेलत हाेते. या प्रसंगी जळांद्रीचे सरपंच चांगदेव पाटील, शेळगाव सरपंच निवृत्ती पाटील, शांताराम जाधव तसेच गणातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, मुख्याध्यापक आदी उपस्थित होते. या वेळी युवराज पाटील यांनी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी विस्ताराधिकारी डी. एस. लोखंडे यांनी प्रशिक्षण दिले. ते म्हणाले की, १४व्या वित्त आयोगाचे नियोजन ग्रामपंचायतींना करायचे असून एक वर्षांचा आराखडा दीडपट आधी बनवायचा आहे. व त्यापुढील पाच वर्षांचा आराखडा हा दुप्पट रकमेचा बनवायचा आहे. साधारणतः लोकसंख्येनुसार १४व्या वित्त आयोगाचा निधी आता उपलब्ध होणार अाहे. दरडोई म्हणजे माणशी ४०८ रुपये वार्षिक असा आराखडा असेल आणि याचे नियोजन करताना ग्रामपंचायतींनी शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत सदस्यांच्या तिप्पट समिती तयार करावी. मग त्यात ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, ग्राम संसाधन सदस्य, महिला बचत गटाच्या अध्यक्षा, सचिव, कोषाध्यक्ष, सीआरपी, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, तलाठी, कृषी सहाय्यक, पोलिस पाटील, सामाजिक अंकेक्षण समिती सदस्य, सेवानिवृत्त शासकीय-निमशासकीय कर्मचारी, राज्य शासन व केंद्र शासनाचे सर्व कर्मचारी-अधिकारी यांचा समावेश करावा. तसेच बाल सभा, महिला सभा यादीतून सर्वांच्या समस्या जाणून घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व दारिद्र्य निर्मूलनासाठी काय करता येईल, याबाबत नियोजन करावे. , असे आवाहन लाेखंडे यांनी केले. या वेळी केंद्रप्रमुख अलका वानखेडे व मधुकर बहारे आदींनी मार्गदर्शन केले.