मुंबई:
गेल्या काही महिण्यापुर्वी झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट पडले आहे. दोन्ही गटाकडून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागवार बैठका घेतल्या जात आहेत. अशातच आज शिवसेना भवनात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी निवडणुका, महापालिका आणि सिनेटच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
एकमेकांशी समन्वय साधून काम करा. आपल्याला जिंकण्यासाठीच मैदानात उतरायचं आहे, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आज दिले. यावेळी आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, नगरसेवक आणि विधानसभेचे पराभूत उमदेवारही उपस्थित होते.
या बैठकीनंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी मीडियाशी संवाद साधला. सर्वच राजकीय पक्षांच्या निवडणुकीच्या तयारीच्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही या संदर्भात बैठक घेतली असून निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काही गोष्टींचं मार्गदर्शन करण्यात आलं. महापालिका आपल्याकडेच राहणार आहे. त्यामुळे जिंकण्यासाठीच आपण मैदानात उतरू, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचं त्या म्हणाल्या.
निवडणुकीच्या कामांची तयारी करताना एकमेकांशी समन्वय साधा. एक दिलाने काम करा. काही अडचणी आल्यातर वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधा. गाफील राहू नका, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच वॉर्ड पुनर्ररचनेचं टेन्शन घेऊ नका. ज्याची सत्ता आहे, ते वॉर्ड पुनर्रचना करणारच. पण तुम्ही कामाला लागा, असं त्यांनी सांगितल्याचंही त्या म्हणाल्या.