जळगाव,(प्रतिनिधी) – तालुक्यातील डोमगाव येथील अनुदानित प्राथ. आदिवासी आश्रम शाळेत सुरू असलेल्या भोंगळ कारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी धनंजय भिलाभाऊ सोनवणे यांनी आज दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एका तक्रारअर्जाद्वारे केली आहे.
धनंजय भिलाभाऊ सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की,ग्राम विकास शिक्षण प्रसारक मंडळ, मोहाडी संचलित अनु. प्राथमिक आदिवासी आश्रम शाळा डोमगाव, ता. जि. जळगाव येथे आहे. त्यांचा नोंदणी क महा./२०४३/ जळगांव शाळा सांकेतिक क्रमांक १५-०९-०३३ असा आहे.सदरच्या शाळेत गरजु व गरीब आदिवासी विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. परंतु सदरच्या आश्रमशाळेत फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून आदिवासी विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे.
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था तसेच निवाऱ्याची व्यवस्था ही खुप हालाखीची आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी पिण्याची सोय नाही. त्यांना निकृष्ठ दर्जाचे भोजन दिले जाते. तसेच त्यांना दिला जाणारा साप्ताहिक सकस मांसाहार दिला जात नाही.त्यांना स्वच्छतेसाठी साबण तसेच आंघोळीसाठी वेळेवर गरम पाण्याची व्यवस्था केली जात नाही. त्यामुळे त्यांना नियमित तब्येतीच्या तक्रारी असतात. त्यांना योग्य वेळी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून सुरू असलेल्या या चुकीच्या प्रकाराची योग्य ती चौकशी करून उचित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.