नाशिक-महापौर आणि उपमहापौर निवडणूक नाट्यमय वळणावर पोहोचली आहे. भाजपच्या बंडखोर नगरसेवकांपैकी कमलेश बोडके यांनी शिवसेनेच्या नेत्यांसोबत येऊन महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेनं भाजपला दिलेला हा मोठा धक्का आहे, असं नाशिकच्या राजकीय वर्तुळात मानलं जात आहे.
नाशिकच्या महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपुष्टात आलवी आहे. महापौरपदासाठी ११, तर उपमहापौरपदासाठी १० उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. बंडखोरी केलेल्या आठ नगरसेवकांपैकी कमलेश बोडके यांनी थेट महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपच्या बंडखोर नगरसेविका सुनीता पिंगळे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला आहे. शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी, माजी आमदार बाळासाहेब सानप आदी नेते बोडके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी हजर होते. भाजपच्या एकूण तीन नगरसेवकांनी पक्षादेश झुगारून उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं शिवसेनेनं भाजपला दिलेला हा मोठा धक्का आहे, असं मानलं जातं.