पुणे : अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीय. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच असल्याचे दिसतेय. अशातच 17 वर्षीय मुलीवर आजोबा, चुलता आणि वडिलांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आलीय. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे
कॉलेजमधील एका समुपदेशनाच्या तासाच्यावेळी ही घटना समोर आली आहे. ही घटना ऐकून समुपदेशकांनाच धक्का बसला असून, या प्रकरणी 49 वर्षीय वडिलांना विश्रांतवाडी पोलिसांनी वडील, आजोबा आणि चुलत्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
नेमका काय आहे प्रकार?
2016 ते 2018 दरम्यान ही मुलगी उत्तर प्रदेशातील आपल्या गावी गेली होती. मुलीचे आईवडील पुण्यात मोलमजूरी करतात. घरात परिस्थिती नीट नसल्याने लहानपणी तिला उत्तर प्रदेशातील गावाकडे रहायला पाठवलं होतं. त्यावेळी तिच्यावर चुलता विजयने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले तर आजोबा चुंबन घेऊन वारंवार अश्लिल चाळे करत होते. या संदर्भात तिने अनेकदा विरोध केला होता. मात्र दोघेही वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
त्यानंतर ती पुण्यात कुटुंबियांसोबत राहण्यास आली तर वडील अजयनेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मागील सहा वर्षांपासून तिच्यावर हे अत्याचार सुरू होते. याप्रकरणी पुणे शहरात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुलीच्या 49 वर्षीय वडिलांना अटक केली आहे. लवकरच तिचे काका आणि आजोबा यांना अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिका-यांनी सांगितलं की, मुलीचं कुटुंब काही वर्षांपूर्वी पुण्यात आलं.