जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. आता यावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मुख्यमंत्री आपल्या 40 आमदारांना घेऊन जाणार आहेत. एक प्रकारे प्रेयसीच्या आठवणी ताज्या करण्याचाच हा प्रकार आहे, अशी खोचक टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे मुक्ताईनगरच्या अंतुरली गावात जनसंवाद यात्रेसाठी आले होते. यादरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून एकनाथ खडसे यांनी कवितेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली.
एकनाथ खडसेंनी कवितेतून शिंदेंना लगावला टोला; 'जशी प्रेयसीची आठवण येते तशी…. pic.twitter.com/d12v8lKPZW
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) November 17, 2022
‘जशी एका प्रेयसीची आठवण असते, भेट तुझी आणि माझी, अजून त्या दिवसाची, धुंद वाऱ्याची, रात्र पावसाची, तशी हे 40 खोकेवाल्यांना गुवाहाटीला घेऊन जाणार आहे. बाबा रे काय ती झाडी काय, तो डोंगर, काय ते हॉटेल, या परत या आपण आपल्या आठवणी जाग्या करूया, म्हणून एकनाथ शिंदे हे 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला चालले आहे’ अशी टीका एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी कवितेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
तसंच, ‘तुम्हाला गुवाहाटीला जायचं असेल तर नक्की जा, विमानाने जा. पण गोरगरिबांना 2 रुपये किलोनं धान्य तर द्या.. तुम्हाला काय करायचे ते करा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तरी थांबवा. तरुण शेतकरी आत्महत्या करत आहे. ‘या राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. कसला कायदा कसली सुव्यवस्था सर्व सुस्तीत आणि सर्व मस्तीत चालू आहे, अशी टीकादेखील एकनाथ खडसे यांनी केली आहे.