मुंबई,(प्रतिनिधी)- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे फडणवीस सरकारबाबत मोठा दावा केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे यांनी मोठे भाकित केले आहे. आगामी चार ते सहा महिन्यात शिंदे सरकार कोसळेल, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे.
शिंदे गटातील नांदगावचे आमदार सुहास कांदे नाराज आहेत. त्याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या की, त्यांच्यातील नाराज आमदार आमच्यात येतील. तसे चित्र दिसत आहे. सुहास कांदे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. दादा भुसेंवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुहास कांदेंनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
हे सरकार कोणत्या दिशेने जातेय हे स्पष्ट आहे. हे असेच कुरघोड्यांचे राजकारण आणि माणसांना ओलीस ठेवण्याचे राजकारण सातत्याने सुरू राहणार असेल तर हे सरकार जास्त काळ टिकेल असे वाटत नाही. माझ्या निरीक्षणानुसार फार फार चार सहा महिने हे सरकार चालू शकेल, असा मोठा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.