जळगाव- केशव स्मृती प्रतिष्ठान संचालित समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून २० नोव्हेंबर रोजी बालहक्क दिनानिमित्ताने रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात अाले आहे. केशव स्मृती प्रतिष्ठानने समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून २५ राज्यातील १७७ ठिकाणच्या एक हजार चारशे मुलांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात यश आले. या उपक्रमाची सर्वसामान्य नागरिकांना व बालकांना माहिती व्हावी या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती समतोल प्रकल्पाचे प्रमुख दिलीप चोपडा यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली.
जागतिक बालहक्क दिनानिमित्ताने २० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता ३० माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांच्या रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रॅलीला आमदार सुरेश भोळे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अध्यक्ष अनिल राव, डॉ. राजेश डाबी, रजनिकांत कोठारी हिरवी झेंडी दाखवतील. रॅली विविध मार्गातून जात छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात १० वाजता रॅलीची सांगता होऊन येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह, ‘आई-बाबा मला तुम्हाला काही सांगायचे आहे’ या विषयावर मराठी, हिंदी व इंग्रजीतून निबंध लेखन हाेर्इल. या वेळी अध्यक्ष भरत अमळकरांसह विविध मान्यवर उपस्थित राहतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत समतोल प्रकल्पाचे प्रमुख चोपडा यांनी दिली. या वेळी व्यवस्थापिका सपना श्रीवास्तव, डॉ. शैलजा चव्हाण उपस्थित होते.