चाळीसगाव- क्रांतिवीर उमाजी नाईक बहुउद्देशीय मंडळ व महाराष्ट्र राज्य आदिवासी साहित्य अकादमीतर्फे आयोजित पाचवे राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन रविवारी वडजी येथे पार पडले. त्यात १८ ठराव पारित करण्यात आले. यामुळे आदिवासी विकास मंडळ तथा महाराष्ट्र शासनामार्फत संमेलनाचे आयोजन करणे अथवा संमेलनाला शासनाने ५० लाखांचे अनुदान देणे, १ लाख रुपये बक्षीस असलेले भुजंग मेश्राम आदिवासी साहित्य पुरस्कार सुरु करावा, अशा मागण्यांचा समावेश आहे.
इतर ठरावांमध्ये आदिवासी खान्देशातील भिलाऊ, पावरी, तडवी, भिलोरी, पारधी, अहिराणी या बोलीभाषेचा समावेश कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात करावा, तंट्या मामा भील व खाज्या नाईक यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल खान्देशात भव्य स्मारक उभारणे, आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गंत आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये आदिवासी साहित्यिकांची पुस्तके उपलब्ध करून देणे, आदिवासी भिलाऊ भाषेला राजभाषेचा दर्जा, इंग्रज काळाप्रमाणे आदिवासींची स्वतंत्र बटालियन निर्माण करून त्याचे मुख्यालय नंदुरबार येथे असावे यासारख्या मागण्यात केल्या आहेत.
जिल्ह्यात आदिवासी कला दालन उभारा
आदिवासी समुदायाच्या नामशेष होणाऱ्या बोलीभाषांचे जतन, संवर्धनासाठी स्वतंत्र अभ्यास व संशोधन मंडळ निर्माण करावे, चाळीसगाव किंवा जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आदिवासी कला दालन किंवा सभागृह निर्मिती, आदिवासी साहित्यावर पीएचडी करण्यासाठी विशेष संशोधन अनुदान देण्याची मागणी झाली.