नाशिक: नाशिकरोड रेल्वे स्थानकात आज सकाळी सकाळी द बर्निंग ट्रेनचा थरार पाहायला मिळाला. मुंबईकडे येणारी शालिमार-हावडा एक्सप्रेस नाशिक रोड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर उभी होती. यावेळी सकाळी 8.30 वाजता अचानक एक्सप्रेसच्या इंजिनला आग लागली. सकाळी सुटलेला गार वाऱ्यामुळे या आगीने भराभर पेट घेतला आणि प्रचंड धूरच धूर झाला.
त्यामुळे रेल्वेतील प्रवाशी प्रचंड घाबरले आणि त्यांनी हातातलं सामान टाकून जीव वाचवण्यासाठी रेल्वेतून पळ काढला. एक्सप्रेसला अचानक लागलेली आग आणि प्रवाशांची उडालेली धावपळ यामुळे रेल्वे स्थानकात एकच आफरातफरी निर्माण झाली होती. या आगीत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. आगीवर नियमंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे.
आगीची माहिती मिळताच सर्वात आधी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी स्टेशनवर धाव घेऊन आग विझवण्याचं काम सुरू केलं. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाली. सर्वांनी आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, आगीवर अजूनही नियंत्रण मिळवण्यात आलं नसल्याचं सांगितलं जात आहे.
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठी वित्तहानी झाली आहे. संपूर्ण डबाच जळून खाक झाला आहे. आगीचं नेमकं कारणं समजू शकलं नाही. इंजिन तापल्यानं ही आग लागली असावी असा कयास वर्तवला जात आहे.