भुसावळ । महिलांसह मुलींवर होणारे अत्याचाराचे प्रमाण थांबता थांबत नाहीय. भुसावळ शहरातून अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना समोर आलीय. अल्पवयीन मुलीशी मैत्री करून जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका भागात राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शहरातील राज लोणारी याने अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला विश्वासात घेवून तापी नगर भागात स्टुडीओत नेत तिच्यावर जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरू होता.
तसेच अत्याचार केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून तिचा विनयभंग केला. तसेच पिडीत मुलीच्या आईवडीलांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर पिडीत मुलीने आईवडीलांसोबत भुसावळ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी राज लोणारी याच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहे.