मुंबई,(प्रतिनिधी)- गेल्या तीन चार महिन्यापासून शिंदे सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून मंत्रिपदांचे ५०- ५० टक्के वाटप होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’वर पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याने मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळते याकडे लक्ष लागून आहे.
ठाकरे सरकार कोसळल्यावर ९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह शिंदे गटाचे नऊ आणि भाजपच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाला होता त्यानंतर आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून त्यासाठीचा ५० – ५० टक्के प्रमाणे फॉर्मुला ठरला आहे.
बच्चू कडूंच्या नाराजीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की कडू यांची ही नाराजी येत्या दोन दिवसात दूर होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बंड करण्यापूर्वी अयोध्येचा दौरा केला होता. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले जात होते. याबाबत विचारले असता, लवकरच अयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.