जामनेर,(प्रतिनिधी)- सर्वत्र दीपावलीचा आनंदत्सव सुरु असतांना काळाने घाला घालत दीपावलीच्या दिवशीच विजेचा धक्का लागून वीज वितरणच्या दोन वायरमनचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या फत्तेपूर येथे सोमवारी सकाळी १० वाजता ही दुर्दैवी घटना घडली. गणेश प्रकाश नेमाडे (४५, रा. कन्हाळा ता. भुसावळ) आणि सुनील भरतसिंग चव्हाण (४०, रा. टाकळी पिंप्री ता. जामनेर) अशी मृत वायरमनची नावे आहेत. गणेश हे वायरमन म्हणून महावितरण मध्ये होते तर सुनील हे झिरो वायरमन होते.
कापसाच्या शेतात खांबावरील पडलेले तार उचलायला गेले… आणि…
फत्तेपूर येथील पेट्रोल पंपासमोरील कापसाच्या शेतात खांबावरील तार खाली पडल्याचा निरोप मिळाल्याने गणेश आणि सुनील हे तिथे पोहोचले. पडलेल्या या तारेला हात लावताच गणेश यांना शॉक लागला आणि ते जागीच ठार झाले. तर दवाखान्यात नेत असतानाच सुनील यांचा रस्त्यात मृत्यू झाला. पाणावले. गणेश यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
गणेश व सुनील चव्हाण यांचे मृतदेह जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर त्यांच्या परिवारातील सदस्यानी केलेल्या आक्रोशामुळे उपस्थितांचेही डोळे भरून आले.दरम्यान, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सकाळी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली आणि शासनाकडून मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.