मुंबई, दि.21: राज्यामध्ये दि. 21 ऑक्टोबर, 2022 अखेर 32 जिल्ह्यांमधील एकूण 2 हजार 920 गावांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव असून 1 लाख 27 हजार 597 बाधित जनावरांपैकी 81 हजार 564 जनावरे उपचाराद्वारे रोगमुक्त झाली आहेत. उर्वरित बाधित जनावरांवर उपचार सुरु असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
श्री. सिंह म्हणाले की, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 21 ऑक्टोबर, 2022 अखेर 140.97 लाख लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यातील 134.18 लाख मात्रांद्वारे जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे. जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली, वाशिम, जालना, हिंगोली आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी जनावरांना केलेल्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 95.90% गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाल्याचे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत लम्पीमुळे देशभरात दि. 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत 8 हजार 400 जनावरांचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच या रोगाचा उपचार सुरू झाल्यास जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी होते. सर्व पशुपालकांनी लम्पीच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्र/दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. सिंह यांनी केले.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. 7 ऑक्टोबर, 2022 रोजी किटक नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील किटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायतींनी मोहीम स्वरूपात राबवाव्यात. सर्व पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या दि. 17 ऑक्टोबर, 2022 रोजीच्या सुधारीत उपचार शिफारशींनुसार उपचार करावेत असेही श्री. सिंह यांनी सांगितले.