सोलापूर,(महेश गायकवाड)- काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मल्लिकार्जून खर्गे यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. एम एम खर्गे यांनी काँग्रेसमध्ये कोणी मोठा आणि छोटा असे नसेल आम्ही सर्वजण काँग्रेस कार्यकर्ता म्हणून काम करु, असे म्हटले आहे.
मल्लिकार्जून खर्गे हे विजयी झाल्यानंतर त्यांनी सोनिया गांधींचे आभार मानले तर राहुल गांधी शी त्यांनी फोनवरुन चर्चाही केली. यानंतर अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविलेले उमेदवार शशी थरूर यांनी काँग्रेस भवन येथे बोलतांना म्हणाले की,मल्लिकार्जून खर्गे साहेब माझे नेते आहेत, असे म्हणत त्यांनी खर्गे यांचे थरुर यांच्याकडून अभिनंदन केले व शुभेच्छा ही दिल्या.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मल्लिकार्जून खर्गे यांनी माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडल्याबद्दल मल्लिकार्जून खर्गे यांनी या प्रक्रियेतील सर्वांचे आभार मानले. प्रतिस्पर्धी उमेदवार शशी थरुर यांचे देखील खर्गें यांनी आभार मानले. निवडणूक चांगल्या प्रकारे पार पडली. थरुर मला येऊन भेटले, दोघांमध्ये चागंली चर्चा झाली, आम्ही दोघं मिळून सोबत काम करणार आहोत, असं खर्गे यावेळी म्हणाले.
सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने सोनिया गांधी यांचे आभार मानतो. त्यांनी वैयक्तिक त्याग करुन २३ वर्ष काँग्रेससाठी दिली. सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वात दोन वेळा केंद्रात सरकार स्थापन केले. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला उभारी दिली. सोनिया गांधी यांचा कार्यकाळ इतिहासात लक्षात ठेवला जाईल. आज देशात सर्वात मोठी समस्या महागाई, बेरोजगारी आणि श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वाढती दरी असून ही दरी कमी करणे, देशात वाढवली जाणारी द्वेष भावना कमी करणे, या प्रश्नांवर देशवासियांना एकत्रित आणण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा करत आहेत. या यात्रेत प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे कर्नाटक राज्यात सद्या ही यात्रा मार्गक्रमण करत आहे कर्नाटक च्या जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे असे ही खर्गे यांनी सांगितले.
संपूर्ण देशातील लोक या यात्रेशी जोडले जात आहेत. देशातील काँग्रेस कार्यकर्ते आणि जनतेने भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी केले. राहुल गांधी यांनी फोनवरुन आपणाशी चर्चा केली. त्यांनी माझे अभिनंदन केले. मी काँग्रेसच्या सैनिकासारखे काम करत राहीन,असे राहुल गांधी म्हणाल्याची माहिती मल्लिकार्जून खर्गे यांनी याप्रसंगी सांगितले. भारत जोडो यात्रेत असूनही त्यांनी वेळ काढून फोन केला याचा मला आनंद आहे. असेही खरगे म्हणाले.
काँग्रेसमध्ये कोणी मोठा नाही छोटा नाही, आपल्याला काँग्रेस कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे. देशाच्या संविधानावर होणारे हल्ले आणि लोकशाही संपवण्याच्या प्रयत्नांविरोधात लढायचे आहे. फॅसिझम आणि सांप्रदायिकतेविरुद्ध लढायचे आहे, असेही मल्लिकार्जून खर्गे म्हणाले.
दरम्यान,काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर मल्लिकार्जून खर्गे यांची मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी, व प्रियांका गांधी यांनी भेट घेऊन अभिनंदन केलं. खर्गे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या शशी थरुर यांनी देखील अभिनंदन करत मल्लिकार्जून खर्गे माझे नेते असल्याचे म्हटले आहेत.