मुंबई, दि. १८ :- राज्यातील सर्वसामान्यांची दिवाळी गोड जावी आणि शिधावाटप दुकानांवर धान्य घेणाऱ्या लाखो नागरिकांना दिवाळी सणानिमित्त चार वस्तू फक्त १०० रुपयांत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर या वस्तू जनसामान्यांपर्यंत अल्पकालावधीत पोहोचविण्याच्या दृष्टीने विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. १९ व २० ऑक्टोंबरपर्यंत या चारही वस्तू जिल्हापातळीवर सर्व रेशनिंग दुकानांवर पोहोचविण्यात येतील व त्यानंतर या वस्तूंचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
चार वस्तूंचा पुरवठा शिधावाटप दुकानांवर योग्य पद्धतीने होण्याच्या दृष्टीने मंत्री श्री. चव्हाण स्वत: लक्ष घालत असून त्यांनी आज राज्यातील विभागाच्या अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली. दिवाळीपूर्वी चार वस्तूंचा शिधाजिन्नस संच हा पात्र शिधावाटप पत्रिकाधारकांपर्यंत योग्य पद्धतीने लवकरात लवकर कसा वितरीत होईल याचे नियोजन करावे, असे निर्देश मंत्री श्री. चव्हाण यांनी या बैठकीत दिले. या प्रसंगी अन्न, नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, नियंत्रक शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा कान्हुराज बगाटे, उपस्थित होते. तसेच, व्हीसीच्या माध्यमातून सर्व उपायुक्त पुरवठा, सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी, सर्व उपनियंत्रक शिधावाटप तसेच सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले की, राज्यातील अंत्योदय अन्न योजनेतील 25 लक्ष, प्राधान्य कुटुंबातील 1.37 कोटी व औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ जिल्ह्यांतील एपीएल (केशरी) मधील सुमारे 9 लक्ष शिधावाटप पत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच वितरित करण्यात येणार आहे. असे एकूण १ कोटी ७१ लाख एवढ्या शिधापत्रिकाधारकांना सदर शिधाजिन्नस संच वितरित करण्यात येणार आहे. सदर शिधाजिन्नस संच पात्र शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस प्रणालीद्वारे १०० रु. या दिवाळीसाठीच्या सवलत दराने वितरित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिवाळी सणानिमित्त 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या चार वस्तू प्रत्यक्षात वेगवेगळ्या ठिकाणांवरुन रेशनिंग दुकानांपर्यंत अथवा रेशनिंग गोदामात पोहोचणार आहेत. आणि शिधावाटप धारकांना त्यांचे एकत्रित वितरण केले जाणार आहे. या योजनेचा लाभ अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील शिधावाटप पत्रिका धारकांना तसेच पात्र एपीएल (केशरी), शेतकरी शिधावाटप पत्रिका धारकांना दिवाळी निमित्त या योजनेचा लाभ मिळणार आहे, असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.
राज्यातील गोरगरिबांची दिवाळी गोड जावी या उद्देशाने शासनाने घेतलेला हा निर्णय अतिशय पारदर्शक आहे. त्या दृष्टीने निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविण्यात आली.