जळगाव – खान्देशात प्रथमच छंद शिबीर आज 15 नोव्हेंबर पासून तीन दिवस कमल वाणी बालनिकेतन विद्यामंदिर येथे सकाळी 9 ते 12 या वेळेत घेण्यात येत असून पोस्टाची तिकिटे याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
जळगावच्या फिलेटली ग्रुपच्या वतीने आयोजन असून शिबिरासाठी जागा मर्यादित आहे. रामानंद नगर भागातील विवेकानंद नगर येथील कमल वाणी बालनिकेतन विद्यामंदिर येथे हे शिबीर होईल. उदघाटन जेष्ठ पत्रकार मिलिंद कुलकर्णी करणार असून यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नाशिक येथील शांतीलाल हिरण, आ.राजुमामा भोळे, डाक अधीक्षक राजेश रनाळकर उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी मजिद झकेरीया आहेत.
शिबिरात पोस्टाच्या तिकिटांचा इतिहास, ती कशी जतन करावी, तिकिटांचे आराखडे, विविध पोस्ट प्रदर्शनात सहभाग यासह पोस्ट तिकिटांसाठी असणा-या शिष्यवृत्ती व स्पर्धांची माहिती भारतीय डाक विभागाचे जिल्हा डाक अधिकारी राजेश सोनाळकर यांचेसह नाशिक, पुणे येथील तज्ज्ञ माहिती देणार आहेत. रविवारी पोस्टाच्या तिकिटांचे प्रदर्शन लावले जाणार आहेत.
डाक खात्याचे शिबिरासाठी सहकार्य मिळत आहे. जिल्ह्यातील कला व संस्कृतीचा दर्जा यामुळे उंचावणार असून उपस्थितीचे आवाहन डॉ. युवराज वाणी, पी.एम.महाजन, सुरेश पांडे आदी आयोजकांनी केले आहे.