मुंबई : दसरा मेळाव्यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. अखेर आज तो दिवस येऊन ठेपला आहे.त्यामुळे राज्यातील सर्व जनतेचं लक्ष या दसऱ्या मेळाव्यावर आहे.परंतू यावेळी शिवसेना पक्षाचे दोन मेळावे होणार आहेत. दोन्ही दसरा मेळाव्यांविषयी राजकीय वर्तुळाला आणि जनसामान्यांना वाटणारी उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.
एकीकडे ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर, तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावर होईल. त्या मेळाव्यांसाठी मोठी गर्दी जमवून आपापली ताकद दाखवण्याची जय्यत तयारी दोन्ही गटांनी केली आहे. मेळाव्यांमध्ये दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर धारदार शाब्दिक बाण सोडण्याची कुठलीही कसर सोडणार नाहीत. त्यामुळे मेळाव्यांमधील भाषणांचे पडसाद पुढील काळातही उमटत राहतील.
शिवसेनेवर हक्क सांगण्यासाठी दोन्ही गटांमध्ये आधीपासूनच जुंपली आहे. आम्हीच खरी शिवसेना, असा दावा दोन्ही गट करत आहेत. तो दावा दसरा मेळाव्यांमधून आक्रमकपणे ठसवण्याचा प्रयत्न ते गट करतील. मेळाव्यांना उपस्थित राहण्यासाठी राज्यभरातून दोन्ही गटांच्या समर्थकांनी मुंबईकडे कूच केले आहे. ते आमनेसामने आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ती बाब ध्यानात घेऊन पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.