आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत मुलांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीची 2022-23 या वर्षासाठी अर्ज करण्याची मुदत 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असलेली राष्ट्रीय साधन तथा मेधा शिष्यवृत्ती, नॅशनल मीन्स कम मेरिट शिष्यवृत्ती योजना MMCMSS ही आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांना आठवीनंतर शाळा सोडावी लागू नये आणि शिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातही त्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दिली जाते.
प्रत्येक वर्षी इयत्ता नववीमधील निवडक मुलांना एक लाख नवीन शिष्यवृत्ती बहाल केल्या जातात तसेच राज्य सरकारी, सरकारी अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना इयत्ता दहावी ते बारावीपर्यंत ही शिष्यवृत्ती सुरू रहाते. या शिष्यवृत्तीची रक्कम वार्षिक 12,000 एवढी असते.
राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल म्हणजेच NSP हा विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनेसाठीचा एकात्मिक डिजिटल मंच आहे. त्यावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठीची शिष्यवृत्ती योजना (MMCMSS)आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठीच्या शिष्यवृत्ती त्यासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केल्या जातात. ही शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे.
ज्या मुलांच्या पालकांचे सर्व स्रोताकडून मिळणारे उत्पन्न वार्षिक साडेतीन लाखापेक्षा जास्त नसेल ते विद्यार्थी या शिष्यवृत्तीला पात्र आहेत. या शिष्यवृत्तीसाठी असलेल्या निवड परीक्षेला पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांना सातवीच्या परीक्षेत किमान 55 टक्के गुण किंवा त्यासम श्रेणी असणे आवश्यक आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणांमध्ये पाच टक्क्यांची सवलत आहे.)पहिल्या टप्प्याच्या पडताळणीसाठी (एल1)शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2022 तर दुसऱ्या टप्प्याच्या पडताळणीसाठीची(एल2) तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे.