धुळे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उलथापालथ झाली आहे. सातत्यानं नवनवीन घडामोडी सुरु आहेत. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन गटात खरी शिवसेना आमचीच असे दावे सुरु आहेत. त्यामुळं शिवसेनेची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढत आहे.
दरम्यान, असतानाच शिवसैनिक आपली निष्ठा व्यक्त करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या धुळे जिल्ह्यातील एका समर्थकाने तर थेट रक्तानेच पत्र लिहिलं आहे. शिवसेना एसटी कामगार सेनेचे पदाधिकारी मनोज गवळी यांनी चक्क स्वत:च्या रक्ताने निष्ठापत्र लिहून ते उद्धव ठाकरेंना पाठवलं आहे. या पत्राची उद्धव यांनीही दखल घेत गवळी यांना भेटीचं निमंत्रण पाठवलं आहे.
एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असलेले तसेच एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष मनोज गवळी यांनी रक्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत पक्षावरील निष्ठा व्यक्त केली. त्यानंतर उद्धव यांनी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्याशी संपर्क साधत मनोज गवळी यांना थेट मातोश्रीवर बोलावून घेतले. गवळी मातोश्रीवर आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसंच पक्षावर दाखविलेल्या निष्ठेबद्दल आभार देखील व्यक्त केले. रम्यान, यावेळी मनोज गवळी यांच्यासोबत एसटी कामगार सेनेचे आय. एन. मिर्झा हे देखील उपस्थित होते. मातोश्रीवरुन मिळालेल्या प्रतिसादानंतर गवळी भारावून गेले.