मुंबई : अतिवृष्टीमुळं बाधित असलेल्या मात्र, निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून 755 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याचा राज्यातील अंदाजे पाच लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. जून ते ऑगस्ट कालावधीतील अतिवृष्टीमुळं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे ४ हजार ५०० कोटी रुपयांच्या निधीचे शासनाने वाटप केले आहे. एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे जर मदतीचे वाटप केले असते तर ती अवघी १५०० कोटी रुपये राहिली असती, असे सांगून निकषापलिकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा भरीव लाभ मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषामध्ये बसत नसतानाही या झालेल्या नुकसानीपोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद, अमरावती आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार ४८९ हेक्टर क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील ३६ हजार ७११.३१ हेक्टर तर सोलापूर जिल्ह्यातील ७४ हजार ४४६ हेक्टर असे एकूण ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे ७५५ कोटी रुपयांच्या निधीची मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला आहे. या निर्णयाचा सुमारे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
हे पण वाचा :
राज्यातील ४४ अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्यातील या जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी.. 20000 पगार मिळेल, आताच अर्ज करा
भारतीय संघाला मोठा धक्का ; T20 वर्ल्ड कपमधून अनुभवी वेगवान गोलंदाज बाहेर
चालत्या ट्रेनमध्ये चोरी करणं महागात पडलं, चोराला खिडकीला लटकवलं, मग….पहा Video
अंदाजे ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा
आतापर्यंत सुमारे ३ हजार ९०० कोटी रुपयांच्या मदतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले आहे, काही ठिकाणी हे मदतीचे वाटप सुरु असून सुमारे ३० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे, हे ३० लाख आणि आज मदतीचा निर्णय घेण्यात आलेल्या ७५५ कोटीच्या निधीमुळे अंदाजे ३६ लाख शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
‘या’ जिल्ह्यांना होणार लाभ :
राज्य सरकारच्या या निर्णयाचा औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ आणि सोलापूर या जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.