जळगाव (प्रतिनिधी) – भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (GirishMahajan) यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. परंतू सीबीआयने गिरीश महाजनांवर कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही,अशी माहिती खुद्द उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर दुसरीकडे सीबीआय चौकशीची मागणी आम्हीच केली, सत्य उघड होण्याच्या मार्गावर असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, सीबीआयने गिरीश महाजनांवर कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. मागच्या काळात सीआयडीकडे जो गुन्हा दाखल झाला होता तो आम्ही सीबीआयला हस्तांतरीत केला आहे. त्याच प्रकरणात मी एक पेन ड्राइव्ह दिला होता. त्या पेन ड्राइव्हमध्ये कशाप्रकारे खोट्या केसेस दाखल करायच्या याचा खुलासा केला होता. तसेच यामागे कोण आहेत तेही समोर आले होते. हे सगळे प्रकरण आता सीबीआयकडे गेले आहे. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र असेल, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र असेल या सर्व गोष्टींचा पेन ड्राइव्हच्या माध्यमातून खुलासा झाला होता. आता त्याची चौकशी सीबीआय करते आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
सूडाचे राजकारण केले जात असल्याचा महाजन यांचा होता आरोप
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे संचालक विजय पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन, रामेश्वर नाईक, तानाजी भोईटे, सुनील झंवर, नीलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे यांच्यासह २७ जणांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आपले अपहरण करून राजीनामा देण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच त्यांच्याविरोधात सूडाचे राजकारण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. अगदी काही दिवसांनी स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून याबाबतचा मोठा स्फोट झाला होता.
स्टिंग ऑपरेशन प्रकरणी खुद्द महाजन यांचीच होती चौकशीची मागणी
भाजपचे आमदार गिरीश महाजन यांची तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चव्हाण यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दाखवलेल्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणी चव्हाण यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती. दरम्यान पुणे पोलिसांनी याप्रकरणी तक्रार अर्ज सीआयडी कडे दिला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी करणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं. परंतू त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग झाले होते.
सीबीआय चौकशीची मागणी मीच केलीय, सत्य उघड होण्याच्या मार्गावर : गिरीश महाजन
काही जण मुद्दाम माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची अफवा पसरवत आहेत. परंतू राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेबांनी याबाबत खुलासा करून विरोधकांना तोंडघशी पाडले आहे. मुळात सीबीआय चौकशीची मागणी मीच केली आहे. अगदी सत्य उघड होण्याच्या मार्गावर असून लवकरच माझ्याविरुद्धचा षडयंत्राचा भांडाफोड होणार आहे. काही जण नको त्या चर्चा करून असुरी आनंद घेताय. परंतू पुन्हा सांगतो षड्यंत्र उघड होणार असून सत्य उघड होण्याच्या मार्गावर असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.