मुंबई : राज्यातील अनेक भागात काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र अशातच राज्यात पावसाचा पुन्हा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज (दि.24) आणि उद्या (दि.25) कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
मुंबईत गेल्या दोन आठवड्यांपासून पडत असलेल्या पावसाने काल (शुक्रवार) थोडी उसंती घेतली. सकाळी आकाश निरभ्र असल्यामुळे ऊन पडले होते. अधून मधून पडलेली एखादी सर वगळता संपूर्ण दिवसभर पाऊस नव्हता. दरम्यान आज (शनिवार) पहाटेपासून पुन्हा पावसाने मुंबईत हजेरी लावली.
23/09. Weather Forecast for 48 hrs by IMD for Maharshtra pic.twitter.com/QLxNQl2dgj
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 23, 2022
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात 27 सप्टेंबर पर्यंत पाऊस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. काल (दि.23) शुक्रवारी कोकण, गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, आज शनिवारी (दि. 24) अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील 2 दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.