धुळे : एकनाथ शिंदे यांच्या नेतुर्वात झालेल्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत नवीन सरकार स्थापन केलं. त्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. मात्र यानंतर राज्यातील जनतेमध्ये समिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे समर्थन केले जात आहे. तर काही ठिकाणी शिंदे गटाला विरोध करण्यात येत आहे.
अशातच शिंदे गटातील सदस्य आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या धुळे जिल्हा दौर्यादरम्यान कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले. मंत्री दादा भुसे हे साक्री तालुक्यातील कासारे गावात उद्घाटन करत असताना शेतकर्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. इतकेच नव्हे तर पन्नास खोके मंत्री ok अशा जोरजोरात घोषणा देत यावेळी शेतकर्यांनी दादा भुसे यांचा निषेध केला.
धुळे दौऱ्यात दादा भुसेंचा 'पन्नास खोके मंत्री OK' घोषणा देत शेतकऱ्यांकडून जाहीर निषेध pic.twitter.com/weQn045iQR
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) September 3, 2022
यानंतर मंत्री भुसे यांनी काळे झेंडे दाखवणार्या शेतकर्यांना समजूत घालण्यासाठी जवळ बोलावले. मात्र, या शेतकऱ्यांनी मंत्री दादा भुसे यांना कोणताच प्रतिसाद दिला नाही. जून महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्याने दादाजी भुसे हे शिंदे गटात सामील झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दादा भुसे यांची मागच्या 20 वर्षांपासून मैत्री असल्याने ते त्यांच्यासोबत गेले आहेत.