जळगाव,(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारच्या पायउतार झाल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांवर टीका करतांना विरोधकांनी ‘५० खोके व एकदम ओके’ अशी घोषणा दिली होती. सदर घोषणा पावसाळी अधिवेशनात देखील गाजतांना दिसली. याच अनुषंगाने जळगावातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवातही बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी प्रत्येक कार्यकर्त्याने अंगात ‘५० खोके, एकदम ओके’, असलेला टीशर्ट अंगात घातलेला दिसला.कार्यकर्त्यांनी घातलेला हा ‘टी शर्ट ‘ चर्चेचा विषय बनला आहे.
बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत मोठ्या संख्येने युवाशक्ती फाउंडेशनचे कार्यकर्ते….
युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडीया हे युवासेनेचे विभागीय सचिव असून जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक देखील आहेत दर सालाबादाप्रमाणे युवाशक्ती फाउंडेशनच्या वतीने काव्य रत्नावली चौकात बुधवारी युवाशक्ती फाऊंडेशनअंतर्गत सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाची प्रचंड जल्लोषात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. यादरम्यान शहरात काढण्यात आलेल्या बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत मोठ्या संख्येने युवाशक्ती फाउंडेशनचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
५० खोके व एकदम ओके’, असा संदेश…दहा दिवस राहणार अंगात ‘टी शर्ट’
यावेळी मिरवणुकीत सहभागी प्रत्येक कार्यकत्याने अंगात ‘५० खोके व एकदम ओके’, असा संदेश असल्याचे टीशर्ट परिधान केल्याचं पहायला मिळालं. तसेच यावेळी गणपती बाप्पा मोरया या जयघोषाबरोबरच ५० खोके एकदम ओके अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. या कार्यकर्त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. गणेशोत्सवाचे दहाही दिवस कार्यकर्त्यांच्या अंगात हा टीशर्ट राहणार असून याद्वारे युवासेना शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधणार आहे.