जळगावातील राष्ट्रीय महामार्गावरील आयटीआय समोरील घटना
जळगाव – कार व मोटार सायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडक होऊन यात एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज मध्यरात्री सुमारे साडे बारा वाजेच्या सुमारास घडली .भीषण अपघात होताच परिसरात मोठा आवाज झाला. या आवाजाने परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्त व ठार झालेल्या दुचाकीचालकास लागलीच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अविनाश बापू पाटील वय ३० हा तरुण मुळचा धुळे येथील मोहाडी परिसरातील रहिवासी असून तो सध्या जळगाव शहरातील अयोध्या नगर भागात रहात होता. तो मध्य रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास शिव कॉलनी कडून आकाशवाणी चौकाच्या दिशेने पल्सर क्र. एम.एच.१९ – ए.झेड.७७१० हीने जात होता. समोरुन येणारी कार एम.एच १९- सीयु ८९२१ ही शिवकाँलनी कडे जात होती. अचानक दुचाकी चालक तरुण अविनाश पाटील याच्या ताब्यातील दुचाकी कारवर जावून जोरात धडकली. या धडकेत अविनाश पाटील हा जागीच ठार झाला.
या अपघाताचा परिसरात मोठा आवाज झाला. या आवाजाच्या दिशेने परिसरातील नागरिक व वाहन चालक घटनास्थळी जमले. त्यांनी तात्काळ जखमी दुचाकी चालकास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांनी त्यास मयत घोषित केले. चारचाकी वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रामानंद नगर पोलीस ठाण्यात जमा केले आहे. मयत दुचाकी चालक अविनाश पाटील हा वायरमन असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. मयत अविनाश पाटील याचा मोबाईल लॉक असल्यामुळे त्याच्या मोबाईलमधील डाटावरून त्याची माहिती घेणे पोलिसांना शक्य होत नव्हते. परंतु जमलेल्या लोकांनी तो वायमन असल्याचे ओळखले होते. या प्रकरणी आज सामान्य रुग्णालयात त्याचे शव विच्छेदनाचे काम सुरु होते. पुढील तपास पोलीस कर्मचारी विनोद शिंदे करत आहेत.
——–दोन वर्षापूर्वीच लागला नोकरीला———
अविनाश हा दोन वर्षापूर्वी १७ मे २०१७ रोजी महावितरणमध्ये विद्युत सहायक म्हणून नोकरीला लागला होता. अविवाहित असल्याने अयोध्या नगरात भाड्याने खोली घेऊन वास्तव्याला होता. मोहाडी, धुळे येथे वडील रिक्षा चालवतात. त्याच्या पश्चात आई, वडील व एक बहीण आहे. अविनाश हा एकुलता होता.