मुंबई: विधिमंडळाच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनीपेन ड्राइव्ह बाँम्ब टाकत खळबळ उडवून दिली होती. महाविकासआघाडी सरकारच्या काळातील विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांचं स्टिंग ऑपरेशन या पेन ड्राईव्हमध्ये होतं. त्यानतंर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही सभागृहात पेनड्राइव्ह सादर केला आहे.
खानदेशमधून मध्यप्रदेशमध्ये जाण्यासाठी महाराष्ट्र आरटीओ चेक पोस्टवर वाहनधारकांकडून हजारो रुपयाची वसुली केल्या जात प्रकरणी खडसेंनी सभागृहात पेनड्राइव्ह सादर केला आहे. तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील माफियांची रेकॉर्डिंगही अध्यक्षांना दिली आहे. या रेकॉर्डींगमध्ये तहसीलदारांना धमकीसह महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद असल्याचेही खडसे यांनी सभागृहात सांगितले. खडसे यांनी वक्फ बोर्ड जमीन, रोहिणीताई खडसेंवरील हल्ल्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसह सरकारला धारेवर धरले.
‘रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला झाला त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, पण आतापर्यंत या प्रकरणाची चौकशी झालेली नाही. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी ही चौकशी आयपीएस अधिकाऱ्याकडे दिली होती, पण पोलिसांनी आरोपींना सहकार्य केलं,’ असं खडसे विधान परिषदेमध्ये म्हणाले.