- नाशिकः – परतीच्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाशिकमध्ये दाखल झालेत. शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सविस्तर माहिती घेत आहेत.
राज्यातील सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू असताना दुसरीकडे शरद पवार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आहेत. शरद पवार सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाले. इगतपुरीमधील भात पिकाच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्यांच्या व्याथा ते जाणून घेत आहेत. आमच्या हातचं पीक गेलंय. खूप नुकसान झालंय. जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही, असं शेतकऱ्यांनी पवारांना सांगितलं.
प्रशासनाने जिरायती आणि बागायती असा दुजाभाव न करता सरकसकट बागायती समजून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, असं पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचवलं. पवारांसोबत स्थानिक आमदारही आहेत. पवार आज नाशिक जिल्ह्यातील बहुतेककरून सर्वच नुकसानग्रस्त भागाला भेट देण्याच्या प्रयत्नात आहेत.