मुंबई । राज्यात शिंदे – फडणवीसांचे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विरोधी नेतेपक्षाची जबाबदारी आली. शिंदे सरकारच्या स्थापनेनंतर ठाकरे गटातील अनेकांनी नाराजी उघड करत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक मोठा नेता नाराज असून त्यांचे नाराजीनाट्य समोर आले आहे. मात्र, त्यांचे कारण वेगळे आहे. अजित पवारांकडे विरोधी पक्षाची जबाबदारी दिल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात. आतापर्यंत पवारांकडे पाटलांनी काहीही मागितले नाही. मात्र, राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधीपक्षनेतेपद राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याकडे जाईल याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यावेळी विरोधीपक्षनेतेपद आपल्याकडे असावे, अशी जयंत पाटील यांच्या मनात इच्छा होती. मात्र, पक्षातून अजित पवारांचे नाव पुढे करण्यात आल्याने त्यांनी इच्छा बोलून दाखवली नाही.
आता महिनाभरानंतर अजित पवारांवर जयंत पाटील हे नाराज असल्याची चर्चा होऊ लागली आहे. त्यांच्या नाराजीमागचे कारण हे महिनाभरानंतर समोर आले आहे. पवारांकडे विरोधी पक्षाची जबाबदारी देण्यात आल्याने पाटील नाराज झाले होते.