मुख्यमंत्री आमचाच होणार असे शिवसेनेने जाहीर केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या भूमिकेला मोठे महत्त्व आले आहे. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी सध्या दोन पक्ष भांडत आहेत. मात्र, यात जो पक्ष दमेल त्याला नमते घ्यावे लागणार आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. भाजपने कितीही अपक्ष उमेदवारांना हाताशी धरलं तरी ते बहुमताचा आकडा गाठू शकतील असे वाटत नाही. हे पाहता भारतीय जनता पक्षाला शिवसेनेच्या मागण्या मान्य कराव्या लागतील, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत गेल्या अनेक दिवसांपासून आपले बोलणे झालेले नाही. आम्ही शेवटचे संसदेत बोललो त्याला तीन महिन्यांचा काळ लोटला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. हे पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी करण्याची शक्यता नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.