जळगाव : किशोर पाटील यांच्या ऐवजी पाचोर्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभे रहावे. आम्ही त्यांना पाडल्याशिवाय राहणार नाही! एकनाथ शिंदेंनी निवडणूक लढवली तरी इथे शिवसैनिकच विजयी होईल आणि असं झालं नाही तर बापाचं नाव लावणार नाही”, अशा शब्दांमध्ये शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी घणाघाती टीका केली.
पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे शिवसेनेचा हा मेळावा पार पडला. यावेळी संजय सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटात सहभागी झालेल्या बंडखोर आमदारांवरही सडकून टीका केली. यावेळी भडगाव- पाचोरा तालुक्यातील मोठ्या संख्येने शिवसैनिक या मेळाव्याप्रसंगी उपस्थित होते.
जे सोडून गेले ते कावळे आणि जे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ते शिवरायांचे खरे मावळे आहेत. हिम्मत असेल तर सद्यस्थितीत निवडणुका घ्या. बंडखोर आमदारांपैकी एक जरी आमदार निवडून आला तर राजकारण सोडेन, असं थेट आव्हानही त्यांनी बंडखोर आमदारांना दिलं आहे. या बंडखोर आमदारांना आगामी काळात मतदार त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही, असा दावाही सावंत यांनी केला.
पुढे ते म्हणाले, की ज्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविलेल्या आमदारांवर मतदारांनी विश्वास ठेवला त्याच आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. यांच्या समर्थनार्थ समर्थकांनी रॅली काढली, रॅलीत येण्यासाठी नागरिकांना तीनशे रुपये द्यावे लागले, असा आरोपही सावंत यांनी यावेळी बोलताना केला आहे.