जळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय शैक्षिक महासंघ संचालित एन मुक्ता या प्राध्यापक संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय गुरुवंदन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १७ जुलै २०२२ रोजी एन मुक्ताच्या जळगाव शहरातील कार्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे (बेंडाळे महाविद्यालय, जळगाव ) हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. नितीन बारी (एन मुक्ता संघटना केंद्रीय अध्यक्ष) व प्रमुख पाहुणे म्हणून प्रो. डॉ. जे. बी. नाईक (व्यवस्थापन परिषद सदस्य ) कबचौउमवि हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात संघटन गीताने झाली. संघटनेच्या व्याप्तीबद्दल व संघटना साजऱ्या करीत असलेल्या कर्तव्य बोध दिवस, वर्ष प्रतिपदा व गुरुवंदन कार्यक्रम याबद्दलची रूपरेषा संघटनेचे केंद्रीय सचिव प्रा डॉ अविनाश बडगुजर यांनी प्रास्ताविकात मांडली. ते म्हणाले कि, ‘देवाला जन्म देणाऱ्या आईपासून आपल्याला शिकवणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली गुरु आहे. भारतीय समाजात गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा गुरुवंदन कार्यक्रम हा संपूर्ण जगात एक अनोखा सोहळा आहे.”
प्रा. डॉ जयेंद्र लेकुरवाळे यांनी त्यांच्या प्रबोधनातून गुरु-शिष्य परंपरा याबद्दल रामायण-महाभारत तसेच पौराणिक दाखले देऊन मांडणी केली. आधुनिक काळातील विचारवंत स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा दाखला सुद्धा दिला. त्या सोबतच त्यांनी गुरु व शिक्षक यातील फरक सुद्धा स्पष्ट केला. “गुरु म्हणजे कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करतो. तर शिक्षक हे मोबदला घेऊन विद्यार्थी घडविण्याचे काम करतात.”, असे ते म्हणाले. शिक्षकांनी ज्ञानदानाबरोबरच गुरु होण्यापर्यंतचा प्रवास करावा, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. त्याच पद्धतीने भारतीय ज्ञान परंपरेमधील नालंदा व तक्षशिला विद्यापीठांचे दाखले देऊन ती परंपरा जगात कशी सर्वश्रेष्ठ होती? व तश्या पद्धतीची विद्यापीठे आपल्या भारतात निर्मित व्हावीत व त्यासाठी शिक्षकांनी समर्पणाची भावना ठेऊन कार्य केले तर पुन्हा भारत एकदा विश्वगुरू होऊ शकतो. यासाठी त्यांनी शिक्षकांना प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून प्रा डॉ नितीन बारी यांनी गुरु-शिष्य परंपरेला अध्यात्माची जोड देत अधिकचा प्रकाश टाकला. डॉ.बारी म्हणाले की, “गुरू हे जात-धर्माच्या वर आहेत. ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना भारतीय समाज आणि संस्कृतीशी जोडण्याचे काम करणाऱ्या गुरूंची आज गरज आहे. गुरू हे शिष्याला शक्यतेचे संधीत रूपांतर कसे करायचे ते शिकवण्याचे काम करतात आणि त्याला ज्ञानी बनवून त्याच्यातील अज्ञान दूर करतात.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे केंद्रीय सचिव डॉ अविनाश बडगुजर यांनी केले तर आभार प्रदर्शन जळगाव जिल्ह्याचे सचिव प्रा डॉ अजय पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील १८ महाविद्यालयांमधून ४५ शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. यामध्ये मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुर्णी, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, अमळनेर, फैजपूर, भालोद, मारवाड, ऐनपूर, भडगाव, जळगाव, चोपडा, पारोळा, धरणगाव, वरणगाव येथील प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. नितीन बडगुजर, प्रा डॉ राजकुमार कांकरिया, डॉ अनिल बारी, डॉ संजय पाटील, डॉ संदीप माळी इत्यादींनी परिश्रम घेतले.