मुंबई : निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. या निवडणुका पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टला नियोजित केल्या होत्या. मात्र निवडणूक आयोगाने या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.स्थगित करण्यात आलेल्या निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रम यथावकाश जाहीर करण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने कळवले आहे. या निर्णयानंतर निवडणूक जाहीर करण्यात आलेल्या क्षेत्रांत लागू करण्यात आलेली आचारसंहिता लागू राहाणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. या निवडणुका 18 आणि 19 ऑगस्टला नियोजित होत्या. या निवडणुकींसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार होतं. तर 19 ऑगस्टला मतमोजणी होणार होती. पण या निवडणुकीवरुन ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर प्रश्न उपस्थित केले जात होते. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय या निवडणुका होवू नये, अशी मागणी केली जात होती. दुसरीकडे पावसाचा मुद्दा उपस्थित करत काही राजकीय पक्षांनी या निवडणुकीला पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
राज्य निवडणूक आयोगाने 8 जुलै 2022 रोजी या निवडणुकांची घोषणा केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात 12 जुलै 2022 रोजी सुनावणी झाली. समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागासवर्गाबाबत दिलेला अहवाल यावेळी शासनाकडून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला; तसेच 19 जुलै 2022 रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित ठिकाणी आता आचारसंहिता लागू राहणार नाही. सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.