मुंबई, (प्रतिनिधी)- नुकतेच सेवा निवृत्त झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी NSE नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) अधिकाऱ्याचे फोन टॅप केल्याच्या आरोपाखाली पांडे यांच्याविरुद्ध सीबीआयने आणखी तीन नवे गुन्हे दाखल केले असून पांडे यांच्या निवासस्थानाचीही सीबीआयकडून झडती घेण्यात आली आहे यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे अडचणीत आले आहे.
काय आहेत आरोप…
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात सीबीआयने तीन गुन्हे दाखल केले तर ईडीने सुद्धा 2 गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. NSE एनएसई घोटाळ्यात फोन टॅपिंगसाठी वापरण्यात आलेले फोन टॅपिंग मशिन हे संजय पांडे यांच्या आयटी कंपनीने इस्राएलमधून मागवले असल्याचा आरोप आहे.
बेकायदेशीर फोन टॅपिंग केले…
संजय पांडे यांच्या कंपनीने मागविलेल्या या मशिनच्या माध्यमातून NSE एनएसईचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीर फोन टॅंपिंग करून फोन टॅपिंगच्या माध्यमातून इत्यंभूत गोपनीय माहिती ही या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी NSE प्रमुख चित्रा रामकृष्णन यांना दिली जात असल्याचाही आरोप आहे.
सीबीआय आणि ईडीकडे सबळ पुरावे…
संजय पांडे यांच्या कंपनीने केलेल्या या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला असल्याचे महत्त्वाचे पुरावे सीबीआय आणि ईडीला मिळाले आहेत. NSE कर्मचाऱ्यांचे फोन टॅप करण्याच्या बदल्यात संजय पांडे यांच्या कंपनीला ४ कोटी ४५ लाख मिळाल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. फोन टॅपिंगसाठी NSE कर्मचाऱ्यांची परवानगी घेण्यात आली नव्हती अशीही माहिती आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर सीबीआयने केले गुन्हे दाखल
दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर सीबीआयने हे गुन्हे दाखल केले आहेत. संजय पांडे यांच्यासह NSC एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्याविरोधातही सीबीआयने या प्रकरणात नवे गुन्हे दाखल केले आहेत.पांडे आणि अन्य आरोपींशी संबंधित मुंबई, पुणे, लखनौ, दिल्ली, कोटा आणि चंदिगड येथील १९ ठिकाणी सीबीआयने धाडी घालून झडती घेतली.