जळगाव : भडगाव तालुक्यातील भातखंडे येथील रहिवासी तथा सैन्य दलातील जवान दत्तात्रय विठ्ठल पाटील (वय ३९) यांचे, ४ रोजी देशसेवेत असताना अचानक निधन झाले. सहकाऱ्यांसोबत बिकानेर येथून त्रिपुरा येथे रेल्वेने जात असताना, प्रवासात त्यांना भोवळ आली. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. आज मंगळवारी दुपारी शहीद जवान पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार येणार असल्याची माहिती तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी दिली आहे
जवान दत्तात्रय विठ्ठल पाटील यांनी २५ दिवसांपुर्वी कुटुंबाची भेट घेऊन ते कर्तव्यावर परतले होते. त्यानंतर अचानक त्यांच्या निधनाची बातमी आल्यामुळे त्यांचे कुटुंबिय, मित्र व ग्रामस्थांना मोठा धक्का बसला.
जवान दत्तात्रय पाटील यांचे युनिट बिकानेर येथून त्रिपुरा येथे जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होते. यादरम्यान, गोरखपूरजवळ रेल्वे प्रवासात त्यांची अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर पाटील यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपचार सुरू असतानाच दत्तात्रय पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव अलाहाबाद येथील लष्करी रुग्णालयात आणण्यात आले. पाटील यांचे पार्थिव वाराणसी येथून मुंबईपर्यंत विमानाने आणण्यात येणार असून, मुंबईहून भातखंडे येथे मंगळवारी दुपारपर्यंत नेण्यात येईल. दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
जवान दत्तात्रय पाटील हे मार्च २००३ मध्ये नाशिक येथे सैन्यात भरती झाले होते. ते ३०५ फिल्ड रेजिमेंटमध्ये सेवेत होते. त्यांचे प्रशिक्षण हैदराबाद आणि बंगळूर या ठिकाणी झालं आहे. पाटील यांनी सिक्कीम, जम्मू, बिकानेर, लेह, लडाख या ठिकाणी सेवा बजावली आहे. त्यांची बिकानेर येथून आगरतळा या ठिकाणी पोस्टिंग झाली होती. जवान दत्तात्रय पाटील यांच्या मृत्यूने भातखंडे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, लहान भाऊ, बहीण असा परिवार आहे.