मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन करत असलेली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये अनेक संकट आली. या शोमधून अनेकांनी काढता पाय घेतला आहे. तर दुसरीकडे निर्माते शोमध्ये नवनवीन कलाकारांना आणत आहेत. दरम्यान, या शोमध्ये नट्टू काकाची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचं गेल्या वर्षी कर्करोगाने निधन झालं. घनश्याम यांनी बरीच वर्षे मालिकेत नट्टू काकाची भूमिका साकारली होती.
त्यांच्या निधनानंतर नट्टू काकाच्या भूमिकेत दुसरा कुठला कलाकार आणण्याचा विचार नाही, असं निर्मात्यांनी यापूर्वी सांगितलं होतं. मात्र आता मालिकेत नट्टू काकांच्या भूमिकेत एक कलाकार पहायला मिळणार आहे. अभिनेते किरण भट्ट ही भूमिका साकारणार आहेत. ‘तारक मेहता..’च्या अधिकृत यूट्यूब पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये निर्माते असित कुमार मोदी म्हणाले, “घनश्याम नायक यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. परंतु ‘शो मस्ट गो ऑन’ या म्हणीप्रमाणे आम्ही नव्या कलाकाराला ती भूमिका दिली आहे. मला आशा आहे की प्रेक्षक किरण यांनासुद्धा तितकंच प्रेम देतील.”
या व्हिडीओच्या सुरुवातीला असित कुमार मोदी हे जेठालाल (दिलीप जोशी) यांच्या मालकीच्या दुकानात गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रवेश करतात. काही जुन्या क्लिप्समधून प्रेक्षकांना दुकानातील घनश्याम यांची झलक पहायला मिळते. त्यानंतर निर्माते म्हणतात, “नट्टू काकांनाही गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये घडणारी सर्व कॉमेडी नक्कीच आठवत असेल आणि ते वरून हसत असतील.” त्यानंतर ते कॅमेऱ्याकडे पाहून हसत हसत किरण यांचं हात जोडून स्वागत करतात.