मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी)- गुवाहाटीतमध्ये (Guwahati) ठेवण्यात आलेल्या बंडखोर आमदारामध्ये आता वादा वादी उडण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून दावा करण्यात आला असून “गुवाहाटीत बंडखोर आमदारांत वादावादी” या मथाळ्याखाली वृत्त प्रकाशित केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोरांविरोधात राज्यभरातील शिवसैनिक पेटून उठल्याने आसाममधल्या रॅडिसन ब्ल्यू (Radisson Blu) हॉटेलमधील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्मण झाली आहे. त्यातून त्यांचा गुवाहाटीमधील मुक्काम वाढला आहे. मात्र आता या आमदारांचा संयम सुटला असून, त्यांच्यामध्ये भांडणे सुरू झाल्याचा दावा सामना वृत्तपत्रा मधून करण्यात आला आहे.
काय म्हटलं आहे ‘सामना‘ च्या बातमीत…
भाजपने – टाकलेल्या जाळ्यात अडकून महाविकास आघाडी सरकारविरोधात बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही आमदारांनी महाराष्ट्राबाहेर पळ काढला. ठाणे व्हाया सुरत – गुवाहाटीला पोहचताना ४८ ते ७२ तासांत सारे आटोपून महाशक्तीसह आपले नवे सरकार सत्तेत येईल, असे या फुटीरांच्या म्होरक्याने सांगितले होते. मात्र त्याप्रमाणे काहीच घडत नसल्याने आमदारांमधील चलबिचल आणि अस्वस्थता वाढताना दिसत आहे. जसजसे दिवस लांबताहेत तसा संयमही सुटत चालला असून गुवाहाटी मुक्कामी असणाऱ्या बंडखोर आमदारांत वादावादी आणि खटके उडू लागले आहेत.
करणाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात सर्वत्र शिवसैनिक पेटून उठल्याने गुवाहाटीच्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये मुक्काम करणाऱ्या आमदारांची धास्ती वाढली आहे. कुटुंबीय धास्तावलेल्या मानसिकतेत आहेत. गद्दारीचा शिक्का, पैसे खाऊन विकले गेल्याचा आरोप होत असून कुटुंबाला घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. ‘आम्ही इथे काय अवस्थेत जगतोय आणि तुम्ही तिकडे मजा मारताय,’ असे प्रश्न कुटुंबीयांकडून विचारले जात असल्याने फुटीर चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यामुळे फुटीरांच्या गटाचे नेते शिंदे यांच्याकडून आमदारांना वारंवार संयमाचे आवाहन केले जात आहे. शुक्रवारी रात्री गुवाहाटीत बंडखोर आमदारांत जोरदार वादावादी शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आता ‘प्रहार’सोबत जाऊन बसायचे का?
महाराष्ट्रातील सत्तेच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे हे सारे केव्हा संपेल, या प्रश्नाचे नेमके व निश्चित उत्तर नाही. सगळे सुरळीत होईल, घाबरू नका, आपलेच सरकार येईल, असे कोरडे उत्तर फुटीर गटाच्या नेत्यांकडून दिले जात आहे. आपला स्वतंत्र गट आणि तीच खरी शिवसेना हे स्वप्न आता स्वप्नच राहणार असल्याने बंडखोरी करत आमदारकी पणास लावणारे आता ‘प्रहार’ सोबत जाऊन बसायचे का? अशी विचारणा होऊ लागली आहे.
ज्या महाशक्तीच्या भरवशावर बंडखोरी करायला भाग पाडले ते कुठेही सत्तासंघर्षाच्या या मैदानात दिसत नाही.बंडखोरांवर अपात्रतेच्या कायदेशीर कारवाईची लढाई सुरू होताच महाशक्तीने हात वर केल्याने आमदारांची धास्ती वाढली.फुटीर गटाकडे ३७ आमदार नाहीत किंवा तशी त्यांना खात्री नाही त्यामुळेच मुंबईत येण्याचे टाळले जात आहे.