मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील पॉलिटिकल ड्रामा काही संपायचं नाव घेत नाही. त्यात आता रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. अशातच आता शिवसेनेचे अकोला जिल्ह्यातील आमदार नितीन देशमुख यांनी सुटका करुन पळून आल्याचा दावा खोटा असल्याचं बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून करण्यात आला आहे. त्यासंबंधी देशमुख यांचा एक फोटो शेअर करण्यात आला असून देशमुख यांना स्पेशल चार्टर विमानाने नागपूरला पोहोचवण्यात आल्याचं या गटाकडून स्पष्ट करण्यात आलं.
अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे गटावर आणि भाजपवर काही आरोप केले होते. गुजरात पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन जबरदस्तीने इंजेक्शन टोचलं. माझा घात करण्याचा प्रयत्न होता असा आरोप त्यांनी राज्यात परत आल्यावर केला होता.
नितीन देशमुखांनी केलेला हा आरोप आता खोटा असल्याचं एकनाथ शिंदे गटाकडून सांगण्यात आलं. नितिन देशमुख यांचा गुवाहाटी ते अकोला हा परतीचा प्रवास खाजगी विमानाने झाला. एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांनी सन्मानाने त्यांना अकोल्याला पोहोचवले असल्याचं सांगण्यात येत असून त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकण्यात आली आहेत. नितीन देशमुखांच्या सोबत दोन कार्यकर्ते दिले असल्याची माहितीही शिंदे गटाकडून करण्यात आली.
शरद कणसे आणि चेरी डेविड असं या दोन व्यक्तींची नावं असून त्यांना नितीन देशमुख यांच्यासोबत पाठवण्यात आल्याचं शिंदे गटाकडून सांगितलं गेलं. पत्नीची तब्येत खराब झाली आहे आणि मुलांना भेटायचं आहे असं देशमुखांनी एकनाथ शिंदेंना सांगितलं. त्यानंतर त्यांना विशेष विमानाने महाराष्ट्रात सोडण्यात आलं.