जळगाव : राज्यात येत्या २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रोज नवनवीन घडामोडी समोर येत आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतशी सर्व लोक अपक्षांची जुळवाजुळव करत आहेत. या दरम्यान, भाजप आमदार संजय सावकारे यांनी जळगावचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना चिमटा काढला. त्यावर गुलाबरावांनी भाजप सरकारच्या काळातही हीच परिस्थिती होती, असं म्हणत सावकारे यांना उलटा टोला लगावला.
त्यावर सावकारे यांनी त्या सरकारमध्ये तुम्हीही सहभागी होतात, असं प्रत्युत्तर देताच एकच हशा पिकला. त्यावर गुलाबराव पाटील यांनीही आमदार सावकार यांना उद्देशून ‘सांभाळून घ्या आपलं सरकार आहे’ अशी विनंती केली. शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी या दोघांच्या संवादावर ‘सरकार कोणाचेही असो, मात्र महावितरण विभागाला त्याचा फरक पडत नाही’ असे सांगत महावितरण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यामुळे आगामी विधानपरिषद निवडणुकांच्या तोंडावर सावकारे यांचे मत एकनाथ खडसेंना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, एकनाथ खडसे हे माझ्यासाठी आदर्श असून आजही मी त्यांना मानतो. परंतु पक्ष सांगेल त्यांना मी मतदान करेन, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी मतदानाबाबत सस्पेन्स कायम ठेवला होता.
हे पण वाचा :
पाचोरा रेल्वेस्थानक आवारात आढळले तब्बल इतक्या लाखाचे दागिने
गुडन्यूज ! आता जनरल तिकिटावर करता येणार प्रवास, मध्य रेल्वेच्या १६५ गाड्यांमध्ये सुविधा
भुसावळ तालुक्यात महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरची असो किंवा इतर कामे रखडलेली आहेत. अनेकदा सूचना-तक्रारी करूनही त्यावर कार्यवाही होत नाही. याला अनुसरून आमदार संजय सावकारे यांनी ‘आम्ही विरोधात आहोत म्हणून आमची विकास कामे होत नाहीत का?’ असा सवाल महविकास आघाडीतील नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर उपस्थित केला.
जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीला व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची उपस्थिती होती. तर या बैठकीसाठी जिल्हातील सर्व आमदार, सर्व विभागांचे विभाग प्रमुख तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.